नागरिकांचा संताप, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
। कळंबोली | प्रतिनिधी ।
कळंबोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक सेक्टरमधील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी वेळ पाणी येत असून, येणारे पाणीही गढूळ व अस्वच्छ असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या मते, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विविध उद्घाटने, प्रसिद्धी आणि इतर मोहिमांमध्ये लोकप्रतिनिधी अधिक व्यस्त असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
विशेषतः सेक्टर 6 ई परिसरात पाणीपुरवठ्याशी संबंधित पंप आणि ट्रान्सफॉर्मर गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून कार्यरत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना वेळेवर पाणी मिळत नसून रोजच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पंप व ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कळंबोलीतील वाढत्या पाणी समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.







