। कोर्लई । प्रतिनिधी ।
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत मुरुड तालुक्यातील 25 शेतकऱ्यांना रोहु, कटला व सायप्रिन या जातींच्या मत्स्यबीजांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यास एक हंडी या प्रमाणे मत्स्यबीजांचे वाटप करण्यात आले.
सदर मत्स्यबीजांचे वितरण मुरुड तालुक्यातील जि. प. सदस्या ज्योती नागावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे , कृषी सेवक प्रदीप मालचे तसेच तालुक्यातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत्स्यपालन हा शेतीला पूरक, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यपालन करून शेततळे, सिंचन तलाव व इतर जलस्रोतांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मत्स्यपालन व्यवसायाचा विस्तार करण्याचेही आवाहन करण्यात आले.
मत्स्यपालनामुळे शेतीबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. कृषी व मत्स्यपालन यांचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात, असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व लाभार्थी शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वितरण कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या करण्यात आले. या उपक्रमामुळे मुरुड तालुक्यात मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.







