6 ते 7 गोविंद नाना विजेचा धक्का
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील लाईन आळी, शिवसेना शाखेजवळ सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्सवादरम्यान अंदाजे 6 ते 7 जणांना विद्युत शॉक बसल्याचे सांगण्यात येत आहे. दहीहंडीचा उत्सव सुरू असतानाच अचानक विद्युत शॉक बसल्याने उत्सवस्थळी काही काळ एकच खळबळ उडाली. घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. अशा वेळी विद्युत जोडण्या, वायरिंग, विद्युत उपकरणे आणि मंडप परिसरातील सुरक्षा याबाबत विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक असते. मात्र, या घटनेमुळे उत्सवाच्या ठिकाणी विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना नेमक्या कितपत करण्यात आल्या होत्या? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
उत्सवाचा जल्लोष की सुरक्षेचा बोजवारा?
नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांसह संबंधित यंत्रणांचीही असते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जखमींची प्रकृती कशी आहे, विद्युत शॉक नेमका कशामुळे बसला आणि या घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होणार, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. उत्सव साजरा करताना नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
