चालक जखमी
। खोपोली । प्रतिनिधी ।
वडवळ टोलनाक्याजवळ माती भराव करीत असताना डंपरचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने आग लागली. ही घटना मंगळवारी (दि.28) दुपारच्या दरम्यान घडली असून विद्युत वाहिनीच्या धक्क्यामुळे चालक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार वडवळ टोलनाक्याजवळ खासगी जागेत मातीभराव सुरू आहे. दुपारच्या दरम्यान माती टाकण्यासाठी चालकांने डंपरचा मागील ट्राँली वर करत असतानाच विद्युत तारेला स्पर्श झाला. यावेळी चालकाला शॉक लागून त्याच्या पायला दुखापत झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने तो बचावला. तर डंपरचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्वरीत टायने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी टाटा कंपनी, खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या जवांनांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. जखमी डंपरचालकाला खोपोली नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.







