रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

| चणेरा | प्रतिनिधी |

यंदाच्या दहीहंडी उत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना रोहा तालुक्यात गोविंदा पथकांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. गावोगावी मंदिरांसमोर, शाळांच्या पटांगणात तसेच मोकळ्या मैदानांवर 7 ते 8 थरांचे मानवी मनोरे रचण्याचा थरारक सराव सुरू असून, गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा रोह्यात दंहीहंडीचा थरार रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

रोहा तालुक्यातील कालभैरव बोरघर, जय बजरंग लाढंर, तळाघर, निवी, धाटाव, किल्ला, रोठ खुर्द, देवकान्हे, नागोठणे, आमडोशी, कडसुरे यांसह अनेक गावांतील गोविंदा पथकांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पथकामध्ये साधारण 100 ते 120 गोविंदा एकत्र येत असून, आपल्या गावाच्या नावाला मान मिळवून देण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचण्याचा निर्धार केला जात आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पथकांचा नियमित सराव सुरू आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत जवळपास दोन तास गोविंदा मैदानावर घाममगाळताना दिसत आहेत. दिवसभराची कामे आटोपून, शेतातून तसेच कामावरून परतल्यानंतरही अनेक गोविंदा सरावाला प्राधान्य देत आहेत. “एक थर वाढवायचा, पण सुरक्षिततेची काळजी घ्यायची” या उद्देशाने अनुभवी गोविंदांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जात असून, यंदा कोणते पथक किती उंच मनोरा रचणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.

Exit mobile version