सुमारे 25 गोविंदा पथकांचा सहभाग; जय हनुमान गोविंदा पथकाचा जल्लोष
| नागोठणे | प्रतिनिधी |
किशोरशेठ जैन मित्र मंडळाच्यावतीने नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि.6) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात सुमारे 25 गोविंदा पथक सहभागी झाले होते. यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथकाला मिळाला.
किशोर जैन मित्र मंडळाचे सर्वेसर्वा किशोरशेठ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते नरेंद्र जैन, भाई टके, शिवराम शिंदे, विलास चौलकर, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र पारखे, संजय भोसले, प्रकाश जैन, संजय महाडिक, हरेश टके, मंगेश तेरडे, अतुल काळे, राजू टेमकर, दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव, कार्यवाहक जितेंद्र जाधव, धनंजय जगताप, प्रकाश कांबळे, मनोज टके, घनश्याम ताडकर आदींसह उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
किशोर जैन मित्र मंडळाच्या या दहीहंडी उत्सवात या दहीहंडी उत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथकाला पथकाला रुपये 55 हजार 555 चे रोख पारितोषिक आणि गदा असलेला आकर्षक चषक देण्यात आले. तसेच, पाच थरांची सलामी देणारे नागोठण्यातील श्री जोगेश्वरी नगर गोविंदा पथक, श्री चौंडेश्वरी माता गोविंदा पथक वरवठणे, जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी, श्री बापदेव गोविंदा पथक वणी व श्री जाखमाता नवतरुण गोविंदा पथक वेलशेत यांना प्रत्येकी 2 हजार 525 रुपयाचे पारितोषिक व चषक देण्यात आले. या संपूर्ण दहीहंडी सोहळ्यादरम्यान अलिबाग येथील गायक महेश पाटील, शलाका पंडित, फनी गेम फेम विनोद नाईक यांनी आपल्या कलेतून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच, पाली येथील ओम साई डान्स अकॅडमीचीच्या कलाकारांनी अनेक सदाबहार समूह नृत्य व स्थानिक बाल कलाकारांनी वैयक्तिक नृत्य सादर करून दहीहंडी उत्सवात रंगत आणली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नागोठणे पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन दहीहंडी उत्सव समितीचे कार्यवाहक प्रकाश कांबळे यांनी केले.
