शेकाप पुरस्कृत मानाच्या दहीहंडीचा रंगतदार उत्सव

ग्रामीण व शहरी भागातही साजरा केला जल्लोष

| अलिबाग | प्रतिनिधी |

‘मच गया शोर…., गोविंदा रे गोपाळा…’ या गाण्यांच्या सुरावर ठेका घेत रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शेकाप पुरस्कृत अलिबाग, पेझारी व कुर्डूस येथे मानाच्या व अभिमानाच्या दहीहंडी उत्सवाचा आनंद गोविंदा पथकांसह व प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. पावसात भिजत, अनेक गोविंदा पथकाने मानवी मनोरे उभारून सलामी दिली. पाऊस सुरु असतानादेखील दहीहंडीचा उत्साह कायमच दिसून आला. त्यामुळे अलिबागच्या दहीहंडीचा सोहळा अतिशय रंगतदार ठरला.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.तरीदेखील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी दुपारी दोन वाजल्यापासून शेतकरी भवन समोर जमण्यास सुरुवात केली. पाऊस असतानादेखील गेल्या अनेक वर्षाची परंपरा पाहण्यासाठी अलिबागमध्ये काही तासातच अलोट गर्दी झाली. डिजेचा ठेका, सुमधूर अशी गाणी, विजेचा झगमगाट, शिस्तबध्द नियोजन, फुलांनी सजविलेली दहीहंडी, तरुणाईच्या सन्मानाचा तसेच गोविंदा पथकासह उपस्थितांच्या सुरक्षेचा विचार करून अलिबागमध्ये दहीहंडी उभारण्यात आली. उंचावर बांधण्यात आलेली दहीहंडी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक अशी सजविली होती. त्यामुळे अनेकांनी ही दहीहंडी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला. काहींनी व्हीडीओ तर काहीं दहीहंडी समवेत सेल्फीचाही आनंद लुटला.


कुलाबा ढोल ताशा व ध्वज पथकामार्फत ढोल ताशांच्या गजरातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्ष शैला पाटील,शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा वृषाली ठोसर, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, किशोर हजारे, सतिश प्रधान, अशोक प्रधान, नागेश कुलकर्णी, विक्रांत वार्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता ढवळे, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, ॲड, रवि थोरात, अशिष रानडे, विकास घरत, अलिबाग अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे, आदींसह माजी नगरसेवक, प्रशांत नाईक मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये एकूण 53 गोविंदा पथकाने सहभाग घेतला. त्यात 29 पुरुष गोविंदा पथक व 24 महिला गोविंदा पथकाचा समावेश होता. अलिबागमधील पाचनाका महिला गोविंदा पथकामार्फत दहीहंडी सलामीला सुरुवात झाली. त्यानंतर कानिफनाथ महिला गोविंदा पथक तसेच मी अलिबागकर महिला गोविंदा पथकामार्फत संध्याकाळपर्यंत पाच थरांचे मानवी मनोरे उभारून यशस्वी सलामी देण्यात आली. त्यानंतर अलिबागमधील मेटपाडा येथील श्री मरीआई गोविंदा पथकाने (पुरुष) पहिल्याच फेरीला आठ थरांचे मनोरे उभारून एक वेगळा इतिहास केला. त्यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर गावदेवी महिला गोविंदा पथक भुते मार्फत चार थरांची तसेच गावदेवी पुरुष गोविंदा पथक भुते मार्फत सहा थरांची सलामी देण्यात आली. श्रीदत्त्त पुरुष गोविंदा पथकाने सहा थरांची सलामी दिली. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

आला रे आला गोविंदा आला… , शेकापच्या हंडीची वेगळीच हवा… अशा अनेक गोविंदाच्या गाण्यांचा आनंद डिजेवर घेण्यात आला. डिजेच्या ठेक्यावर अनेकजण थिरकले. अलिबाग तालुक्यातील पेझारी व कुर्डूस येथे शेकाप पुरस्कृत दहीहंडीचा थरार शनिवारी दुपारपासून पहावयास मिळाला. या सोहळ्याचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे लुटला.

दहीहंडी पाहण्याचा आनंद घरबसल्या
अलिबागमधील शेतकरी भवन समोर शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या सोहळ्यातील गर्दीमध्ये काहींना प्रत्यक्षात हा सोहळा पाहता येत नाही. त्यामुळे घरबसल्यादेखील दहीहंडी उत्सव बघण्याची व्यवस्था करण्यात आली.
स्पर्धा नसून एक उत्सवाचा सोहळा
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग व प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाची परंपरा सुमारे 21 वर्षापासून सुरु आहे. दहीहंडी उत्सवाचा मानबिंदू ठरणारे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबागमध्ये निटनेटके,उत्तम व्यवस्थापन व आयोजन केले जाते. ही स्पर्धा नसून उत्सवाची परंपरा जपण्याचे काम गेली अनेक वर्षापासून करण्यात आले आहे. गोविंदा पथकांना आर्थिक बळ देऊन पारंपारिक खेळाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहसी, एकता व समानतेचा संदेश या दहीहंडी सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला.
जिल्ह्यात नऊ हजार हंड्या फोडल्या
जिल्ह्यामध्ये आठ हजार 979 दहहंड्या फोडण्यात आल्या गोपाळकाळा निमित्त जिल्ह्यात 355 ठिकाणी मिरवणूका काढून उत्सव साजरा करण्यात आला. काही ठिकाणी सांस्कृतिक तर काही ठिकाणी बाल्या नृत्यांचे सादरीकरण करीत पारंपारिक नृत्याचे दर्शन घडवून आले. अनेक ठिकाणी साखळी करीत संपुर्ण गावात, शहरातील गल्लीत जाऊन दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम जल्लोषात साजरा केला. या उत्सवात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. लहान मुलांबरोबरच तरुणाईंनीसुध्दा या उत्सवाचा आनंद घेतला.
पारंपारिक खेळाला एक व्यासपीठ
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पाली, माथेरान, दादर, खोपोली, मुरूड, महाड, नागोठणे, रोहा, कर्जत, नेरळ, पेण, श्रीवर्धन, माणगांव, पनवेल, उरण अशा अनेक ठिकाणी राजकिय पक्ष, सामाजिक संस्था, मित्र मंडळ, फाऊंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली. दुपारी एक वाजल्यापासून सुरु झालेल्या या सोहळ्यात पाच हजारापासून तीन लाखांपर्यंत बक्षीसे गोविंदा पथकासाठी ठेवण्यात आली. बक्षीसांसह करोडोची उलाढाल बक्षीसांवर झाली असून सलामी देणाऱ्या पथकांवरही लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.
Exit mobile version