शेकाप पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित स्पर्धेचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील शेकाप पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली असून गुरुवारी (दि.7) दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शेतकरी भवन समोर दहहंडी फोडण्याचा थरार पहावयास मिळणार आहे. सलामीच्या दहीहंडीनंतर मानाच्या दहीहंडीचा कार्यक्रम रंगणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकालानिमित्त दरवर्षी जनजागृतीपर चित्ररथ अनेकांसाठी कायमच आकर्षण ठरत आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व चांद्रयान हा विषय घेत चित्ररथ स्पर्धा ठेवली आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण झाल्याबाबत आणि चंद्रावर पाऊल टाकून जगात भारताने एक वेगळा ठसा उमटवला. ही भारतीय नागरिकांसाठी अभियानाची गोष्ट असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथ स्पर्धा अलिबाग शहरापुरती मर्यादित असून प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये व द्वितीय क्रमांकास सात हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
दुपारी तीन वाजल्यापासून सलामीची दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरु होणार आहे. सलामीची दहीहंडी पुरुष गटासाठी पाच थरांची तर महिला गटासाठी चार थरांची असणार आहे. सलामीची दहहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सलामीची दहीहंडी फोडण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाला एकच संधी दिली जाणार आहे. तसेच मानाची एक लाख 21 हजार 111 रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी पात्रता फेरी घेतली जाणार आहे. या फेरीसाठी गोविंदा पथकाला दोनवेळाच संधी दिली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यासाठी चिठ्ठी सोडत पध्दतीने संधी मिळणार आहे. एक लाख 21 हजार 111 रुपयाच्या बक्षीसासह गदा देऊन विजेत्या गोविंदा पथकाचा सन्मान केला जाणार आहे. अलिबाग शहरातील शेतकरी भवन समोर दहहंडीचा हा थरार नागरिकांना पहावयास मिळणार आहे.
यु टयूबवर पहाता येणार कार्यक्रम
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित मानाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे हे 20 वे वर्षे असून यंदा 52 गोविंदा पथकाने सहभाग नोंदविला आहे. आधुनिकतेच्या बदलानुसार प्रत्येकाच्या घराघरात दहीहंडीचा कार्यक्रम पोहचिवण्याचे काम आयोजकांनी केले आहे. यंदा यु टयूबद्वारे नागरिकांना घरबसल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.
दहीहंडी कार्यक्रम आनंदात साजरा करा
दहीहंडीचा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक पर्वणी आहे. शेकाप पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित व वेगवेगळ्या संस्था संघटनाच्यावतीने अलिबाग शहरात दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाने हा सण आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.