बोर्लीपंचतनमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनमध्ये गोविदांचा उत्साह वाढला आहे. गावागावातुन जागोजागी सजलेल्या दहीहंड्याआणि कृष्ण जन्मोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. यावेळी बोर्लीपंचतन येथील गणेश पेठ खोतीमध्ये गोकुळाष्टमी निमित्ताने नूतन श्रीकृष्ण मूर्ती व सजविलेल्या पाळण्याची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हरिकीर्तन, भजन, नृत्य असे अनेक कार्यक्रम येथे कृष्ण जन्मोत्सव ठिकाणी दोन दिवस साजरे करण्यात येत आहेत.
बोर्लीपंचतन शहरासह वडवली, वेळास, शिस्ते, कापोली दिवेआगर गावांत वैशिष्टपूर्ण असा पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला सण साजरा होत आहे. परंपरेनुसार गावात प्रत्येक खोतीची वेगळी फळी असते. येथे जास्त लटकलेल्या दहीहंडी कमी पाहायला मिळतात. मात्र, नारळाच्या फोफळीवर एकदम टोकावर लावलेली दहीहंडी फोडायला तेवढाच उत्साह तरुणाईमध्ये दिसत आहे. यंदा परिसरात एकूण 1356 दहीहंडया फुटणार आहेत.
153 वर्षाची श्रीकृष्ण जन्मोत्सवाची परंपरा
गेली 153 वर्षे म्हसळा येथे श्री राम पेठकर समाजाचा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा म्हसळा येथील पेठकर समाजाचे तथा शिंपी समाजाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र विष्णू ढवळे यांच्या निवासस्थानी होते. त्यांचे वडील कै. विष्णू ढवळे हे समाजाचे अनेक वर्षे खजिनदार म्हणून प्रामाणिक पणे काम करीत होते. त्यांच्या वाडवडीलांपासून समाजाची सेवा नित्याने आणि सातत्याने सुरु होती आणि आजही त्यांचे चिरंजीव महेंद्र ढवळे यांनी ही जन्मोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. तर कुंभार समाज गोविंदा पथकाचा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा पूर्वापार समाजाचे म्हेतर गणेश म्हशीलकर यांचे निवासस्थानी साजरा केला जातो. म्हसळ्यात श्री राम पेठकर समाज गोविंदा पथक, कुंभार समाज गोविंदा पथक आणि सोनार-कासार गोविंदा पथक अश्या गोविंदा खेळल्या जातात. त्यापैकी श्रीराम पेठकर समाज गोविंदा पथक आणि कुंभार समाज गोविंदा पथक या गोविंदा पथकांच्या गोविंदा संपूर्ण शहरभर खेळविल्या जातात. श्री राम पेठकर समाजाची गोविंदा ही ढवळे यांच्या निवासस्थानापासून सुरु होते आणि तिथेच या गोविंदा पथकाचा समारोप होतो.
राऊत कुटुंबियांचा कृष्णजन्माष्ठी उत्सव
कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमिच्या दिवशी साजरा केला जातो. गेली 90 वर्षापासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची चौथी पिढी सहभागी झाली आहे. या उत्सवाला गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरुण मंडळी, महिला वर्ग व जेष्ठ नागरिक मोठया संख्याने हजेरी लावतात.
या गोपाळकाला उत्सवाबाबत गावातील बुजुर्ग मंडळींच्या माहितीनुसार आणि राऊत कुटुंबियांच्या घरातील श्रीमती सुशीला महादू राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्या या घरात सून म्हणून येण्यापूर्वीपासून हा उत्सव होत असल्याचे सांगतात. त्यांचे सासरे कै. गोपाळ वाळकू राऊत हे गणेश उत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन उल्हासनदीच्या पात्रात केल्यानंतर मुठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर आशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेऊन पूजाविधी केली. आणि त्यानंतर पुढे जन्माष्टमिचा उत्सव सुरु झाला. आज या उत्सवाला 91 वर्ष पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले.