पाली अंबा नदी पुलाची दैना

रेलिंग तुटल्या, खड्डे, चिखल व राडारोडा
प्रवास धोकादायक, अपघाताचा वाढला धोका

| पाली/बेणसे | वार्ताहर |

अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत आहे. अनेकदा या नदीने धोक्याची पातळी ओलंडली. त्यामुळे मागील आठवड्यात वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलावरून चार ते पाच वेळा पाणी गेले. यामुळे पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय, पुलावर मोठाले खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व राडारोडा पसरला आहे. यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तसेच वाहन चालक आणि पादचार्‍यांची खूप गैरसोय होत आहे.

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवासी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. मात्र, या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

पावसाळ्याआधीच या पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) तुटले आहेत. आणि आता पुलावरून पाणी गेल्यामुळे इतरही रेलिंग वाहून गेले आहेत. त्यांना आधार देणारे सिमेंटचे काही ठोकळेदेखील निसटले आहेत. कमकुवत लोखंडी कठडे, मोठाले खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येऊन साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत आहेत. पादचार्‍यांनादेखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते.

वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. संरक्षण कठड्यांअभावी येथे अपघाताची शक्यता आहे. येथील नवीन पुलाचे काम वेळीच होणे गरजेचे होते. मात्र, त्यामुळे आता वाहन चालक, प्रवासी व पादाचारी यांना जीव मोठे घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. शिवाय, पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रचंड गैरसोय होते. नवा पूल होईपर्यंत किमान या जुन्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.

– कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.

– सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी



नवीन पूल अपूर्ण
अंबा नदीवरील पूल जुना अरुंद व कमी उंचीचा आहे. या पुलाच्या बाजूला नव्याने मोठा पूल बांधण्यात येत आहे. मात्र, कामातील दिरंगाई व संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे या पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलाचे काम वेळीच पूर्ण झाले असते, तर प्रवासी व विद्यार्थ्यांचा असा खोळंबा व गैरसोय झाली नसती.

Exit mobile version