माजी सरपंचासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गावकीच्या मालकीची असलेली जमीन परस्पर लुटून फसवणूक करणार्या आवासच्या माजी सरपंचासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त तलाठ्याचादेखील सहभाग असल्याची माहिती देण्यात आली आहे.आवासमधील जागृत ग्रामस्थ महेंद्र मच्छिंद्र कवळे यांनी हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड करून तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील गट क्रमांक 251, 271/1 (जुना गट क्रमांक 416/1) कडील मिळकत आवास गावकरी लोक यांच्या नावाने आहे. या जागेबाबत 1947 पासून पंच निवडले जातात. या जागेवर आवास गावातील प्रत्येक स्थानिकांचा मालकी हक्क आहे. 31 जानेवारी 2017 च्या कराराने गट नं. 251, 257/1 अ कडील मिळकतीपैकी 40 गुंठे मिळकत ही महावितरण कंपनीला बेकायदेशीररित्या व पंच मंडळीच्या कोणत्याही अधिकाराशिवाय भाडेपट्ट्यासाठी प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे 99 वर्षांच्या कराराने दिली.
20 जुलै 2009 ते 31 जानेवारी 2017 च्या दरम्यान दिनकर हरी जाधव, सुरेश सीताराम राणे, दत्ताराम शांताराम भगत, सुहास नारायण म्हात्रे, अभिजीत प्रभाकर राणे, प्रमोद मधुसुदन राणे यांनी संगनमत करून फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट करून आवास गावकरी लोकांच्या असलेल्या मिळकतीवर सातबार्याची नोंद केली. स्वतःच्या स्वार्थापोटी, खोटी कागदपत्रे, सह्या करून फसवणूक केली. याप्रकरणी आवासचे माजी सरपंच अभिजीत राणेंसह तलाठी सुहास म्हात्रे अशा सहा जणांविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र मच्छिंद्र कवळे, विजय छगन राणे, कुंदन वसंत इकर, सुधाकर बाळकृष्ण राणे, विजय बाळकृष्ण राणे, विजय यशवंत राणे, रुपेश विश्वनाथ राणे, केशव वामन घरत यांनी माहितीच्या अधिकारी माहिती घेऊन प्रकार उघडकीस आणला. त्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.