| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या महासंग्रामासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांत बदललेली राजकीय समीकरणं, गद्दारी, बंडखोरी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. सध्याच्या सरकारचं गलिच्छ राजकारण संपुष्टात आणण्यासाठी महाविकास आघाडी सर्व ताकदीनं आणि समाजकारणाचं राजकारण करु पाहत आहे. मात्र विरोधकांनी राजकारणाची परिभाषा बदलून त्याला असंस्कृतपणाची करुन टाकली आहे. वयाचा मान न ठेवता, खालच्या पातळीवर जात विरोधी नेते सत्तेचा माज दाखवत ज्येष्ठ नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करीत आहेत. देशाच्या नेत्यांना त्यांच्या वयाचा दाखला देत पुढच्या निवडणूकीत ते नसतील असं बोलून असंस्कृत महेंद्र दळवी यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. महेंद्र दळवी यांनी एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वय बघता ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले आहे.
शिंदे गटाचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधान करीत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारची भाषा खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलं. दळवींचं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर ज्येष्ठ नेत्यांवर टीका करणं कार्यकर्त्यांना पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार, नाना पटोले यांचा झंजावात
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी चार-चार सभांना संबोधित करत आहेत. यामध्ये खासदार शरद पवार, शेकाप नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले हेदेखील मागे राहिलेले नाहीत. आगामी काळात शरद पवार पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. ते पुढच्या दहा दिवसांत म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 36 सभांना संबोधित करणार आहेत. तरुणांनाही लाजवेल असा धडाका महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी लावला आहे. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक सैरभैर झाले असून बेताल वक्तव्य करीत असल्याचा आरोप नागरिकांडून केला जात आहे.