| कर्जत | प्रतिनिधी |
आठवडाभराच्या कडक उन्हानंतर बुधवारी कर्जत तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नेरळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपू लागली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
6 जुलैपर्यंत तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने भात पिकावर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी चिंतेत होता. या नुकसानीची दखल घेत महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. खा. श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कर्जत व खालापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यातील 209 महसुली गावांमध्ये पंचनामा मोहीम सुरू असून, कृषी विभाग नोडल विभाग म्हणून काम पाहत आहे.
खरीप हंगामात तालुक्यात 780 हेक्टरवर भात आणि 7 हेक्टरवर नाचणी रोपवाटिका करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार 58.11 हेक्टरवरील भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असून 588 शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच 6.36 हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेल्याची नोंद झाली आहे.
नेरळमध्ये मुसळधार सरी
बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर नेरळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असले, तरी पावसाअभावी करपू लागलेल्या भात पिकांना मोठा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.







