रिलायन्सच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतीचे नुकसान

। शिहू । वार्ताहर ।

नागोठणेजवळील पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील चोळे येथील शेतकरी लक्ष्मण पोशा कुथे यांच्या शेतात रिलायन्स कंपनीच्या रसायनमिश्रित पाण्याची लाइन फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतीच्या नुकसानाची रिलायन्स कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी लक्ष्मण कुथे यांनी केला आहे.

पावसाळा तोंडावर आला असून, ऐन पेरणीच्या दिवसात शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. चोळे येथील शेतकरी लक्ष्मण पोशा कुथे यांच्या शेतातून रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित पाण्याची लाइन गेली असून, आठ दिवसांपूर्वी ती फुटली आहे. यामुळे शेतीत सर्वत्र पाणीच पाणी भरले आहे. त्यांच्या कुटुंबात कोणीही कमवता नसून, पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. यातच झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी रिलायन्स व्यवस्थापनाकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. वर्षभर शेतीची डागडुजी, बांधबंदिस्ती करून ऐन पावसाच्या तोंडावर शेतीच्या झालेल्या नुकसानामुळे शेतकर्‍याचे अश्रू अनावर झाले. वर्षभर ज्या शेतीवर आपले कुटुंब अवलंबून असते आणि तीच शेती रसायनमिश्रित पाण्यामुळे नापीक झाली आहे. आता खायचं काय, कुटुंबाचा गाढा कसा चालवायचा, हा यक्ष प्रश्‍न शेतकर्‍याला पडला आहे. दरम्यान, रिलायन्स कंपनीच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई न दिल्यास मी आमरण उपोषण करणार असल्याचे बाधित शेतकरी लक्ष्मण कुथे यांनी सांगितले.

Exit mobile version