सुरुंग स्फोटात मुळशी येथील घराचे नुकसान

एकजण जखमी, नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
विहिरीसाठी लावलेल्या बेकायदेशीर सुरुंग स्फोटात सुधागड तालुक्यातील मुळशी गावातील घोडके कुटुंबियांच्या घराचे नुकसान होऊन एकजण जखमी झाला आहे. तसेच दोन वर्षांपासून कळंब ग्रामपंचायतीने या कुटुंबियांना त्यांच्या घराचे असेसमेंट दिलेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई व असेसमेंट मिळून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुधागड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुधागड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मुळशी येथील निवृत्ती घोडके, विमल घोडके व रोहित घोडके या बौद्ध कुटुंबाने कायदेशीरपणे जागा खरेदी करून येथे घर बांधले आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीने त्यांना असेसमेंट उतारा व घरपट्टी भरण्यास दिलेली नाही. तसेच नुकतेच त्यांच्या घराशेजारी एका ठेकेदाराने बेकायदेशीर विहीर खोदण्याकरिता सुरुंग लावले. या सुरुंग स्फोटात घोडके कुटुंबियांच्या घराचे पत्रे फुटून घरातील एक व्यक्ती जखमी झाली होती. या संदर्भात सुधागड तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज करूनदेखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधितांवर कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घोडके कुटुंबियांसमवेत शनिवारी (ता.9) पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, महासचिव आनंद जाधव, सहसचिव तुषार शिर्के यांच्यासह घोडके कुटुंबीय उपस्थित होते.

Exit mobile version