अवकाळीमुळे आंबे काढणीची घाई; चार महिन्यांचा हंगाम दोन महिन्यांवर

। राकेश लोहार । चौल ।
आधीच अवकाळीच्या कचाट्यात सापडलेला हापूस आंबा आता उरले-सुरले पीक हाती यावे, यासाठी बागायतदार शेतकरी काढणीची घाई करीत आहेत. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यापासून मेपर्यंत चार महिने सुरु राहणार हा हंगाम यंदा अवकाळीच्या भीतीने दोन महिन्यातच संपून जाईल, अशी शक्यता अलिबाग तालुक्यातील आंबा व्यापारी सुनील गणपत घरत यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केली.

सुरुवातीपासूनच पावसाची अवकृपा राहिली आहे. आंबा पिकाचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरु होता. हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. गेले काही दिवस अवकाळचे सावट असल्याने आंबा बागायतदारांची तयार आंबा फळे काढण्यासाठी लगबग सुरू आहे. गेले आठवडाभर असलेले ढगाळ वातावरण आणि वाढलेला उष्मा यामुळे मध्यम आकाराच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात गळही सुरू झाली होती. आधीच बागांमध्ये दहा टक्केच आंबा शिल्लक आहे. यातील तयार झालेला आंबा काढून चार पैसे हाती लागतील, अशी आशा सुनील घरत यांनी व्यक्त केली. त्यामुळे उरलासुरला आंबा आहे, तो लवकरात लवकर काढण्याकडे सर्वच बागायदार आणि व्यापार्‍यांचा कल आहे. त्यामुळे यावर्षीचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना हापूसची चव शेवटपर्यंत चाखता येणार नाही, असेही सुनील घरत यांनी सांगितले.

अवकाळीचा सर्वाधिक फटका हापूस आंबा पिकाला बसला आहे. पावसामुळे आलेला मोहोर गळून गेला आहे, तर आलेल्या आंबा पिकावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा आता तोडणीला आलेल्या आंब्यालाही फटका असत आहे. काढणीला आलेला आंबा आणि कैरी अवस्थेतील आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, अवेळी पडणार पाऊस, त्यामुळे पसरणारे कीडरोग यांमुळे आंबा उत्पादक शेतकरी विचित्र अवस्थेत अडकून पडला आहे. त्यामुळे विचित्र हवामानाची आणि त्यामुळे होणार्‍या आंबा पिकाच्या नुकसानीची दखल सरकारी पातळीवरुन घेतली जाणे गरजेचे आहे. हवामानातील चढ-उतार व त्याचा आंबा हंगामावर होत असलेला परिणाम यादृष्टीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाणे आवश्यक आहे. आंबा फळांची गळ होण्यामागील प्रमुख कारणे कोणती या माहितीबररोबरच त्यावरल उपाययोजना कशा आखाव्यात याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आंबा बागायदार प्रवीण गावंड यांनी व्यक्त केली.

ढगाळ वातावरणामुळे हापूसवरील रोगांना निमंत्रणच ठरले आहे. औषध फवारणी वाढवावी लागत असून, त्यावरील खर्चात भर पडली आहे. वाढता खर्च आवाक्याबाहेर असून, तो परवडणारा नाही. खर्च आणि उत्पन्न यातील तफावत वाढत आहे.

सुनील घरत, आंबा व्यापारी, चौलमळा
Exit mobile version