काजुवाडीत संरक्षक भिंतीचे नुकसान

समाजकंटांविरोधात रोहा पोलिसात गुन्हा

। नागोठणे । वार्ताहर ।

रोहा तालुक्यात जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असतानाच अतिक्रमण व दादागिरी करुन जागा हडप करणार्‍यांची वक्रदृष्टी मोक्याच्या ठिकाणच्या जमिनींवर पडली आहे. यातीलच एक ताजी घटना म्हणजे, रोहा तालुक्यातील व रोह्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खारी येथील काजूवाडी गावातील असलेल्या व सैन्य दलातून देशाची सेवा बजाविणार्‍या सैनिक जागा मालकाने आपल्या जागेत घातलेले वॉल कंपाऊंड तोडून नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पांढर्‍या रंगाच्या ईको कारमधून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींकडून शुक्रवारी (दि.21) हे कृत्य करण्यात आले. त्यामुळे काजूवाडी येथील जागा मालक संतोष हरिश्‍चंद्र खिरीट यांच्या तक्रारीनुसार अज्ञातांविरोधात रोहा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले काजूवाडी (ता. रोहा) येथील संतोष हरिश्‍चंद्र खिरीट यांनी काजूवाडी गावातच 10 गुंठे बिनशेती जागा काही महिन्यांपूर्वी संबंधित जागा मालकाकडून खरेदी केली होती. संतोष खिरीट हे देशाच्या सैन्य दलात असल्याने ते सुट्टी मिळाल्यानंतरच अल्प कालावधीसाठी गावी येत असतात. अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी संतोष खिरीट सुट्टीवर आल्याने त्यांनी आपल्या जागेत वॉल कंपाऊंड जोता बांधकाम सुरु केले. सदरच्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आलेले असतानाच शुक्रवारी (दि.21) दुपारी 1 ते 2.30 वा.च्या. सुमारास संबंधित जागेवर येऊन तोडून नुकसान केले आहे. अशा गुंडगिरी करणार्‍यांचा रोहा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी भारतीय सैन्य दलातील संतोष खिरीट यांनी केली आहे.

Exit mobile version