बळीराजाच्या डोळ्यात अश्रू
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या सर्व जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ओढे-नाले पुन्हा जोरदार वाहू लागले लागलेत. याचा थेट फटका भातशेतीला झालेला पाहायला मिळत आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकरी दुःखी झालेला आहे. ऐन कापणीच्या तोंडावर मुसळधार पावसामुळे पीक आडवे केल आहे.
यंदा शेतीला पूरक असा पाऊस झाल्याने भातपीक जोमात होते. त्यामुळे शेतकर्याला यावर्षी उत्पन्न वाढेल, अशी आशा होती. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांच्या अतिमुसळधार पावसामुळे कापणीला आलेले पीक पूर्णतः आडवे पडले असून, शेतकर्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
माझ्या शेतीमध्ये चांगल्या दर्जाचे बियाणे पेरले होते. यावर्षी भातपीकदेखील चांगले आले होते. परंतु, भात कापणीच्या तोंडावर पावसामुळे पीक जमीदोस्त होऊन भाताचे दाणे पूर्णतः कालसर पडले आहेत. आता भात झोडल्याशिवाय पर्याय नाही. उरलेले वीस-पंचवीस टक्केदेखील भात मिळणार नाही. तसेच गुरांसाठी लागणारा पेंडा खराब झाल्याने त्यांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती बोरघर येथील शेतकरी तुकाराम जानु भगत यांनी दिली. रोहा तालुक्यात उद्योगधंद्यामुळे लागवडी खालील क्षेत्र कमी झाले असून, यावर्षी सात हजार हेक्टर क्षेत्र शेतजमीन ओलिताखाली आहे. ज्या शेतकर्यांची भातशेती कापण्यासाठी तयार झालेली आहे, त्यांनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी करे यांनी केले आहे.