लाखो रुपयांचा चुराडा
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात लाखो रुपयांचे रस्ते अवघ्या महिनाभरातच उखडून गेले आहेत. वहुर आणि दासगावमध्ये काँक्रिट पद्धतीने केलेल्या या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. यामुळे शासन नक्की नागरिकांसाठी रस्ते करतात की ठेकेदारांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाड तालुक्यातील तासगाव आणि वहूर गावात तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही महिन्यातच उखडून गेले आहेत. हे रस्ते काँक्रिट कामामध्ये करण्यात आले होते. वहूर येथील रस्ता मुंबई-गोवा महामार्गापासून फजंदार हायस्कूलपर्यंत करण्यात आला होता. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्ची करण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता अवघ्या एक महिन्यातच खराब होऊ लागला. पावसाळ्यामध्ये या रस्त्याची दैना उडाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, यामध्ये पाणी साचले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून लाख रुपये टाकले असले तरी संबंधित ठेकेदारांनी मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अशी अवस्था निर्माण झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. वहूर गावामधील रस्त्याकरिता खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून हा रस्ता होत असल्याचेदेखील ग्रामस्थांनी सांगितले.
अशीच अवस्था दासगाव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्याची झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्यालादेखील लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या रस्त्याचादेखील अवघ्या काही महिन्यातच बोजवारा उडाला आहे. या रस्त्यावरील सिमेंट काँक्रिट निघून गेल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी जाणार्या नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून रस्ते मंजूर करताना गुणवत्तापूर्ण ठेकेदाराची निवड केली गेली पाहिजे. मात्र, ग्रामीण भागामध्ये राजकीय दबावगिरी वापरून कार्यकर्त्यांना या रस्त्यांची कामे दिली जात आहेत. ज्यांच्या नावे निविदा काढण्यात आलेली आहे अशा लोकांकडून किंवा एजन्सीकडून ही कामे केली जात नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडून ही कामे करून घेतली जात असल्याने रस्त्यांची दुरवस्था होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पार्ले गावातदेखील अशीच अवस्था
पार्ले गावामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून करोडो रुपये मंजूर केले गेले होते. एकाच गावासाठी सुमारे दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. या गावातील रस्त्यांचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात आले होते. अवघ्या चार महिन्यांतच रस्त्यावरील काँक्रिट निघून गेले असून, खडे बाहेर पडले आहेत.