। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या फॉरमॅटच्या सुरुवातीपासून अनेक फ्रँचायझी लीग सुरू झाल्या आहेत. या लीग केवळ सक्रिय खेळाडूंनाच नव्हे तर निवृत्त खेळाडूंनाही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देत असतात. अशीच आणखी एक इंटरनॅशनल मास्टर्स लीग सुरू होणार आहे. या लीगमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही आपले कौशल्य दाखवणार असून, सुनील गावसकर यांना या लीगचे आयुक्त करण्यात आले आहे. या लीगचे सामने मुंबई, लखनौ आणि रायपूर येथे होणार आहेत.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग ही वार्षिक टी-20 क्रिकेट स्पर्धा असेल, ज्यामध्ये सुरुवातीला भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि श्रीलंका या सहा क्रिकेट खेळणार्या देशांतील खेळाडूंचा समावेश असणार आहे. या लीगमध्ये अनेक निवृत्त दिग्गज दिसणार आहेत. यामुळे चाहत्यांना जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरच्या पुनरागमनाने लाखो चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण केला आहे. तो पुन्हा एकदा 22 यार्डच्या खेळपट्टीवर बॅटने धावा काढताना दिसणार आहे.