मालिका 2-0 ने जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश
। कानपूर । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाने कानपूरला झालेल्या बांगलादेश संघाविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात 7 गडी राखत विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना चेन्नईला खेळला होता. या सामन्यात भारताने 280 धावांनी विजय मिळवला होता. तसेच, दुसर्या सामन्यातही विजय मिळवल्याने आता भारतीय संघाने मालिका 2-0 ने जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश दिला आहे. भारतीय संघाने कानपूर कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे.
कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही कॅप्टन रोहित शर्माने रणनीती आखली होती. सहकार्यांनीही त्याची योग्य अंमलबजावणी करताना अशक्य वाटणारा विजय मिळवला आहे. दुसर्या कसोटीचा पहिला दिवस 35 षटकांचा झाला. यानंतर दुसरा व तिसरा दिवस पावसामुळे एकही चेंडू न पडता वाया गेला. असे असतानाही ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 स्पर्धेचा भाग असल्याने निकाल महत्त्वाचा होता. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी योग्य मारा करून बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने रणनीती बदलली आणि पहिल्या डावात टी-20 स्टाईलने फटकेबाजी केली. झटपट 9 बाद 285 धावा करून डाव घोषित केला आणि 52 धावांची आघाडी घेतली. यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर गुंडाळला गेला. भारतीय संघाने 17.2 षटकांत 3 बाद 98 धावा करून विजयाची नोंद केली आहे. आणि मालिकाही खिशात घातली. मालिकेच्या निकालाचा परिणाम जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालीकेवरदेखील झाला आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे.
दरम्यान, कसोटीत अश्विनने 11 बळी घेतले आणि यशस्वी जैस्वालने दोन्ही डावांत (72 व 51) अर्धशकी खेळी केली आहे. यामुळे जैस्वालला सामनावीर तर अष्टपैलू कामगिरी करणार्या अश्विनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले आहे. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या हस्ते कर्णधार रोहितला चषक देण्यात आले. राहितने हे चषक आकाश दीपच्या हाती सोपवले आणि स्वतः कोपर्यात जाऊन उभा राहिला. रोहितच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली.
घरच्या मैदानावर भारत अजिंक्य
भारतीय संघ 2013 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका पराभूत झालेला नाही आणि हा त्यांचा 18 वा कसोटी मालिका विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1994 ते 2000 व 2004 ते 2008 या कालावधीत सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.
तिसर्यांदा अंतिम सामना खेळण्याची संधी
भारताचे आता 11 सामन्यांपैकी 8 विजय आणि 2 पराभवांसह 98 गुण झाले आहेत. तसेच, 74.24 सरासरी टक्केवारी आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने आता भारतासाठी पुढचा मार्ग सोपा झाला आहे. तरी अद्याप त्यांच्यासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचे आव्हान कायम आहे. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच तीन सामन्यांची कसोटी मालिका तर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार असून तिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही जर भारताची कामगिरी चांगली राहिली, तर भारत तिसर्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना दिसेल.