। लिमा । वृत्तसंस्था ।
लिमा पेरू येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने याने संयम आणि अचूकतेचा उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे. 16 वर्षीय पार्थ माने याने कनिष्ठ पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पार्थने 250.7 गुणांसह हे पदक जिंकले. तसेच, पार्थ भारताच्या माजी नेमबाज सुमा शिरूर यांच्या प्रशिक्षण घेत आहे.
पार्थने 627.7 गुणांसह चौथ्या पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने आपले कौशल्य दाखवून दिले. त्याने चीनच्या हुआंग लिवानलीनचा 0.7 गुणांनी पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हुआंगला 250.0 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हुआंगने या स्पर्धेत मिश्र गटाचे एक सुवर्णपदक आधीच नावावर केले आहे. अमेरिकेच्या ब्रेडन वेयनने 229.1 गुणांसह कांस्यपदक जिंकले. आश्चर्यकारक म्हणजे जागतिक विजेता आणि पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता स्वीडनचा व्हिक्टर लिंडग्रेन हा चौथ्या स्थानावर राहिला.