रानडुकरांकडून भातपिकांचे नुकसान

शेतकर्‍यांवर पिकांची राखण करण्याची वेळ

| चिरनेर | प्रतिनिधी |

यंदा परतीच्या पावसाने भात पिके तयार होण्याच्या अखेरच्या वेळेला दररोज सायंकाळच्या वेळेला बरसायला सुरुवात केल्याने भात पिके संकटात सापडली होती. आता पाऊस माघारी गेल्याने शेतकर्‍यांनी भात कापणी, बांधणी, झोडणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र शेतमजुरांच्या अभावी कापणीची कामे लांबवली आहेत. शेतमजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भात पिकांवर आता जंगली रानडुकरे मोकाट गुरे आणि जंगली वानरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे चिरनेर गावासह परिसरातील अन्य गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

या प्राण्यांची वक्रदृष्टी पडल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. भातशेती कापणीला आली असताना, मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील काही शेतकर्‍यांच्या भात पिकांची रानडुकरांनी एवढी नासाडी केली आहे की, ही भातपिके कापणी बांधणीच्या लायक राहिली नसल्यामुळे शेतकर्‍यांनी नासाडी झालेल्या भात पिकांची कापणीच केली नसल्याचे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे, दिनेश म्हात्रे यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास रानडुकरे आणि मोकाट गुरे हिरावून नेत असल्याने मोकाट गुरांचा व रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, आवरे, साई, दिघाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकर्‍यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत वनखाते, कृषी विभाग, पोलीस खाते तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडे वारंवार या प्राण्यांपासून नुकसान होत असल्याच्या लेखी तक्रारी करूनदेखील या सर्व खात्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून कित्येक वर्ष वेळ मारून नेली असल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले.

Exit mobile version