| नेरळ | प्रतिनिधी |
हर घर जल अशी संकल्पना असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून असंख्य नळपाणी योजना राबविली आहे. तालुक्यात तब्बल 121 नळपाणी योजनांची कामे जलजीवन मिशन मधून सुरु आहेत. त्या नळपाणी योजनांसाठी तालुक्यात प्रत्येक गावात रस्त्याच्या बाजूला जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. जलवाहिन्या टाकून अनेक महिने उलटले तरी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे आणि रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम जलजीवन मिशन राबविणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांच्याकडून झालेले नाही. दरम्यान, गावोगावी रस्ते खोदलेली असल्याने सर्वत्र चांगले रस्ते मातीचे बनून गावातील रस्ते मातीमोल झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील गाव जोडणाऱ्या आणि मुख्य रस्त्यांची महत्वाची कामे मागील तीन वर्षात वेगाने झाली आहेत. मात्र 2023 मध्ये कर्जत तालुक्यात जलजीवन मिशन आले आणि कर्जत तालुक्यातील रस्ते पूर्वीपेक्षा खराब बनविले गेले आहेत. तालुक्यातील बहुतेक सर्व गावात जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनांची कामे सुरु आहेत. तालुक्यातील 121 नळपाणी योजनांची कामे सुरु असून 200 हुन अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये या नळपाणी योजना राबविल्या जात आहेत. जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनांसाठी गावागावातील रस्त्यांची पुरती धूळधाण ठेकेदारांनी केली आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आणि त्यानांतर ते रस्ते पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी असताना देखील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेच्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षपणामुळे कर्जत तालुक्यातील रस्ते हे खोदून ठेवले होते ते आजही आहेत.
तालुक्याच्या प्रत्येक गावात रस्त्यांची अशीच अवस्था असून जलवाहिन्या टाकण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या बाजूने देखील खोदकाम केले आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची मालकी असलेल्या रस्त्यावर कोणतीही परवानगी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा किंवा जलजीवन मिशन कडून घेण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील रस्ते खोदल्यानंतर ते पुन्हा दुरूस्त करण्यासाठी योजनेमध्ये निधी राखून ठेवलेला असतो. मात्र त्यातून देखील रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडून होत नाही. रस्ते खोदायची आणि त्यात जलवाहिन्या टाकायच्या आणि नंतर माती टाकून रस्ते असेच ठेवून द्यायचे असे प्रकार तालुक्यात घडले आहेत. सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक तसेच डांबरी रस्त्याची अशी अवस्था जलजीवन मिशन मधून जलवाहिन्या टाकताना झाली आहे. कर्जत तालुक्यातील नेरल कशेले रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पाईपलाईनसाठी रस्त्याची साईटपट्टी खोदण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रासदेखील होत आहे.
नळपाणी योजना राबविताना जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागले आहेत. त्या रस्त्यांची दुरुस्ती करणायचे आदेश संबंधित ठेकेदार याना देण्यात आले आहेत.
अनिल मेटकरी
उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग