। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ जवळील कोतवाल वाडी ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेतील इमारतींचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ट्रस्टमध्ये मुली आणि महिलांच्या उत्कर्षासाठी महिला विकास केंद्र चालविले जाते. त्या केंद्राच्या इमारतींना वादळाचा तडाखा बसला आहे. दरम्यन,इमारतींचे मोठे नुकसान झाल्याने तेथील महिलांचे क्लासेस बंद पडले आहेत.
कोतवाल वाडी ट्रस्टमध्ये स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र असून त्या केंद्रामध्ये समाजातील गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शिवणकला, नर्सिंग आणि अन्य कोर्सेस शिकविले जातात. त्या इमारतींवरील पत्रे वादळाने उडून गेले आहेत. तर तेथील सुरक्षारक्षकाचे घर देखील कोसळले आहे. त्याबाबत महसूल विभागाला कळविण्यात आल्यानंतर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी कोतवाल वाडीमध्ये जाऊन पंचनामे केले. त्यात सिमेंट तसेच लोखंडी पत्रे, पाईप, हॉलचे सिलिंग आणि फॅन असे 56 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, कोतवाल वाडी ट्रस्ट हि अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीवर चालते. केंद्राला पुन्हा उभारी देण्याची गरज असल्याचे ट्रस्टच्या विश्वस्त संध्या देवस्थळे यांनी सांगितले. तसेच महिला विकास केंद्रात अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कोर्सेस चालविले जात असल्याने त्या सर्वांना नुकसानीची माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील, अशी माहिती ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांनी दिली आहे.