एकाच शिक्षकावर दोन वर्गांचा भार
| श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरामधे नगरपरिषदेच्या पाच शाळा असुन अपुर्या शिक्षकामुळे एकाच वर्गात दोन वर्ग बसवले जातात. नगरपरिषदेच्या शाळांवर कार्यरत असणार्या जिल्ह्या बाहेरील शिक्षकांनी काही वर्षे नगरपरिषदेच्या शाळामधे सेवा केल्यानंतर आपापल्या गावाला बदली करून घेतल्यामुळे रिक्त जागा न भरल्या गेल्यामुळे सध्या नगरपरिषद शाळांवर कार्यरत असणार्या शिक्षकांवर दोन वर्ग सांभाळावे लागत आहेत. गेली दोन वर्ष कोरोना व निर्बंध ह्यामुळे नवीन शिक्षकांची भरती न झाल्याने नगरपरिषद शाळांना शिक्षकांची उणीव भासत आहे. शिक्षकांना मिशन झिरो ड्रॉप आऊट तसेच इतर शासकीय कामांचा भार पडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
सद्यपरिस्थीत शाळा क्र. एक येथे पहिली ते सातवी वर्ग असून विद्यार्थी 194 शिक्षक पाच, शाळा क्र. दोन येथे पहिली ते चौथी विद्यार्थी 147 शिक्षक चार, शाळा क्र.तीन येथे विद्यार्थी 63 शिक्षक दोन, शाळा क्र.सहा येथे विद्यार्थी 72 शिक्षक दोन, शाळा क्र.सात येथे विद्यार्थी 104 शिक्षक तीन असून पाच शाळांमधे मिळून 580 विद्यार्थ्यांसाठी 16 शिक्षक कार्यरत आहेत. नियमानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ह्या प्रमाणे तीन शिक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे. श्रीवर्धन नगरपरिषद शाळेकरिता प्रशासन अधिकारी(शिक्षण विभाग)हा प्रभारी न देता कायमस्वरूपी द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
माझी मुलगी शाळा क्र.एक मध्ये चौथी इयत्तेत शिकत असून शिक्षक कमी असल्याने काही वेळा सातवीच्या वर्गात बसवण्यात येते. वर्ग एकत्र असल्याने चौथीच्या मुलांचा अभ्यास करताना गोंधळ होतो.
– मंगेश चांदोरकर, पालक