श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाला दुचाकीची प्रतीक्षा

गस्तीसाठी खासगी दुचाकीचा वापर

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींचे छेडछाडीपासून संरक्षण व्हावे यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात दामिनी पथकाला दुचाकी नसल्याचे समोर आले आहे. सध्या श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील दामिनी पथकातील अंमलदाराना गस्तीसाठी खासगी दुचाकीचा वापर करावा लागत आहे.

तरुणी आणि महिला यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, शाळा, कॉलेज, बसस्थानक अशा ठिकाणी विद्यार्थीनींना तरुणांकडून होणारा त्रास, अत्याचारासारख्या घडणाऱ्या घटना इत्यादीपासून महिलांना सुरक्षितरित्या समाजात वावरता यावे यासाठी महिला मार्शल पथक म्हणजेच ‘दामिनी’ पथकाची स्थापना करण्यात आली. श्रीवर्धन पोलीस ठाण्यातही २०१५ साली दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे.

दामिनी पथक हे दोन टप्प्यांत काम करत आहे. पहिला टप्पा म्हणजे पोलीस गणवेशात दुचाकीवरून शहरात गस्त घालण्याचे काम, तर दुसरे काम म्हणजे दुचाकीवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणे. दामिनी पथकाची श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे स्थापना झाल्यानंतर काही दिवसातच दुचाकी देण्यात आली. दामिनी पथकातील अंमलदार श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवरून गस्त घालत असल्याने विद्यार्थींनी, महिलांत सुरक्षेततेची भावना निर्माण झाली होती.
श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत ४८ गावं येत असून क्षेत्रफळ ६२८.३४ चौरस किलोमीटर आहे. तर लोकसंख्या ४६,९३९ इतकी आहे. यामध्ये अंदाजे २२,१४३ महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी दामिनी पथकातील अंमलदार सांभाळत आहेत. २०१५ साली दामिनी पथकाला देण्यात आलेली दुचाकी सध्या बंद अवस्थेत आहे. दामिनी पथकासाठी अद्यापही नवीन दुचाकी देण्यात आल्या नसल्याने या पथकातील अंमलदार खासगी दुचाकीचा वापर करत आहेत.

दामिनी पथकासाठी एक दुचाकी मिळण्याकरिता वाहतूक नियंत्रक अधिकारी, अलिबाग यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे.

– उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन पोलीस ठाणे

Exit mobile version