रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यात यंदाच्या पावसाने अक्षरशः जलक्रांती घडवून आणली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील 28 धरणांपैकी तब्बल 21 धरणे तुडुंब भरली असून, जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा 90.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या अनेक गावांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड ठरली आहे.

यंदा पाणीटंचाईची झळ जुलै महिना सुरू होईपर्यंत जाणवत होती. साधारण एक लाख 60 हजार नागरिक या टंचाईत होरपळून निघाले होते. सध्या पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील 21 लघुपाटबंधारे भरली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सवा दरम्यान ही पावसाचे सातत्य कायम असल्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची भर घातली. परिणामी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येत होती. मात्र, यंदा धरणांतील मुबलक जलसाठ्यामुळे अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठी दिलासा मिळाला आहे.

जलस्रोतांची पातळी वाढणार
धरणांतील वाढलेल्या जलसाठ्यामुळे विहिरी, कूपनलिका आणि इतर स्थानिक जलस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
लघुपाटबंधारे विभागाची धरणे केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर लघु सिंचन योजना, शेतीसाठी पाणीपुरवठा आणि भूजल पुनर्भरणासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे धरणे भरल्याने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. सिंचनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येणार असून, कृषी उत्पादन वाढीसाठीही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
सरासरी 93.08 टक्के पावसाची नोंद
जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा 173.1 टक्के पाऊस झाला. त्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. 15 सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 93.08 टक्के पाऊस आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने धरणांमधील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Exit mobile version