दमदार पावसाने 19 धरणे तुडुंब
जिल्ह्यातील जलसाठा 84.37 टक्क्यांवर
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्या आणि धरणांतील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी या पावसाने जिल्ह्यातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील 28 प्रमुख धरणांपैकी तब्बल 19 धरणे 100 टक्के भरली असून, एकूण जलसाठा 84.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे रायगडकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे दूर झाली आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांमध्ये रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, कवेळे, उन्हेरे, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील कोथुर्डे, खैरे, वरंध, खिंडवाडी, मुरूड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, पेण तालुक्यातील आंबेघर, खालापूर तालुक्यातील भिलवले, कोलते-मोकाशी, डोणवत, पनवेल तालुक्यातील मोरबे आणि श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी या धरणांचा समावेश आहे.
याशिवाय पनवेल तालुक्यातील उसरण आणि बामणोली धरणांमध्ये सुमारे 90 टक्के जलसाठा झाला असून, ढोकशेत, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, रानिवली तसेच कर्जत तालुक्यातील साळोख आणि अवसरे या धरणांमध्येही 50 टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामुळे उर्वरित धरणांतील जलसाठ्यातही आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.







