| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवून स्व. नारायण नागू पाटील, स्व. दत्ता पाटील आणि स्व. प्रभाकर पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे जयंत पाटील आजही त्याच निष्ठेने, त्याच जिद्दीने आणि तितक्याच प्रामाणिकपणे जनतेसाठी झटत आहेत. 71व्या वर्षातही त्यांच्या विचारांतील ताजेपणा, संघर्षाची धार आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा किंचितही कमी झालेली नाही. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अलिबागमध्ये जमलेला जनसागर हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा महासागर आहे. “भाईंचा वाढदिवस हा केवळ अभिनंदनाचा दिवस नाही, तर प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. त्यांनी कधी टक्केवारीचे राजकारण केले नाही, कधी पदासाठी किंवा पैशासाठी तडजोड केली नाही. हजारो विकासकामे केली, पण त्याची जाहिरात कधी केली नाही. अशा नेत्याच्या विचारांचा वारसा प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचवला पाहिजे,” असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडीप्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत लाल बावट्याचा विजय मिळवून देणे, हेच भाईंना खरी वाढदिवसाची भेट ठरेल. त्यांच्या स्वप्नातील विजय त्यांच्या चरणी अर्पण करेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, हा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने आज करायला पाहिजे, असे आवाहनही ॲड. म्हात्रे यांनी केले.







