। माणगाव । प्रतिनिधी ।
उणेगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री काळभैरव मुंबईकर मंडळ, सत्त्वे आळी यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय खुल्या गटाची नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सोमवारी (दि.16) रात्री 9 वा. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नृत्यसंघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक, लोकनृत्य, देशभक्तीपर तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रंगतदार सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकास 11 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकास सहा हजार 666 रुपये, तृतीय क्रमांकास पाच हजार 555 रुपये व चतुर्थ क्रमांकास तीन हजार 333 रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. परीक्षकांनी सादरीकरणातील ताल, अभिनय, सर्जनशीलता व एकूण सादरीकरण यांचा विचार करून निकाल जाहीर केला. कार्यक्रमास ग्रामस्थ, पालकवर्ग व तरुणाईची मोठी उपस्थिती लाभली. आयोजक मंडळाने उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या नृत्यस्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. श्री कालभैरव मुंबईकर मंडळ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पुणे गाव यांनी या नृत्य स्पर्धेचे उत्तम असे नियोजन केले होते.







