बंदरात धोक्याचा बावटा;गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस मार्गावरील प्रवासी लाँच बंद

। उरण । वार्ताहर ।
विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेटवे -एलिफंटा , गेटवे -जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी वाहतूक मंगळवारी (दि.12) संध्याकाळपासूनच बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या इशार्‍यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली असल्याची माहिती बंदर अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

खराब हवामान आणि पावसाचा फटका येथील सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा मंगळवारी संध्याकाळी लावण्यात आला आहे.त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया- एलिफंटा दरम्यानची लॉचसेवा बंद करण्यात आली आहे. लॉचसेवा बंद करण्यात आल्याने पर्यटक वाहतूक ठप्प झाली असल्याचे घारापुरी बंदर विभागाचे अधिकारी विनायक करंजे यांनी दिली.

याशिवाय गेटवे ऑफ इंडिया येथुन जेएनपीए बंदराकडे प्रवाशांना घेऊन जाणारी तसेच भाऊचा धक्का ते मोरा, सागरी सेवाही मंगळवारी संध्याकाळपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली. याशिवाय करंजा- रेवस दरम्यानची तरसेवाही कालपासूनच बंद करण्यात आली आहे.

Exit mobile version