अपूर्ण रस्त्यामुळे अपघाताचा धोका

रस्ते विकास महामंडळ उदासीन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातून खोपोली आणि पुढे वाकण येथे गोवा राष्ट्रीय महामार्ग असा जोडणारा रस्ता असून, या रस्त्यावर कर्जत-खोपोली यादरम्यान चार ठिकाणी रस्ता अपूर्ण अवस्थेत आहेत. त्या भागातील रस्त्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रस्ता अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने रात्रीच्या वेळी मोठे अपघात त्या भागात संबंधित रस्त्यावर होत आहेत. याच मार्गावरील कशेळे भागातील रस्त्यावरील अर्धवट राहिलेली कामे महामंडळाकडून सुरू झाली आहेत, मग खोपोली भागातील कामे कधी सुरू होणार, असा प्रश्‍न समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून शहापूर-मुरबाड-खोपोली आणि पुढे वाकण येथे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग गोवा महामार्गाला जाऊन मिळतो. या राष्ट्रीय महामार्गावर कर्जत ते खोपोली भागातील रस्त्याचे दुपदरीकरण पूर्ण  झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळी सतत अपघात होत असतात. या राज्यमार्ग रस्त्यावर तब्बल चार ठिकाणी रस्त्याचे दुपदरीकरण अर्धवट आहे. त्यातील दोन ठिकाणी तर रस्ता दुपदरीकरण कामासाठी खोदून ठेवलेला आहे. मात्र, त्या दोन्ही ठिकाणी अद्याप रस्त्याचे काँक्रिटीकरण राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून अपूर्ण आहे. नांगुर्ले स्थानिक शेतकरी आणि रस्त्याचा वाद गेली दोन वर्षे सुरु असून, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून सोडविण्यात आलेला नाही. तर, पळसदरी गावाच्या अलीकडे बळावरच हा रास्ता एकेरी झाला असून, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे रस्ता खड्ड्यात हरवला आहे. त्या ठिकाणी पूर्वीचा डांबरी रस्ता काँक्रिटीकरण खोदला होता. मात्र, तीन वर्षांत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम केले नाही आणि त्यामुळे खड्डेच खड्डे आहेत.

पळसदरी गावाच्या पुढे खोपोली कडे जाणार्‍या वळणावर रस्त्याचा एक भाग किमान 100 हून अधिक मीटर खोदून ठेवलेला आहे. रस्त्याचा भाग अपूर्ण अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. दुसरीकडे या रस्त्यावर डोलवली रेल्वे स्टेशन च्या बाहेर देखील उतारावर रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आलेले नाही. तर आंजरून गावाजवळ रास्ता मातीने भरला असून, वाहन चालक मागे आणि पुढे दुपरी रस्ता आणि मध्येच खड्डेमय रस्ता अशी स्थिती झाल्याने वाहनचालक सतत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी करीत असतात. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा नूतनीकरण करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version