निकृष्ट साईडपट्टीमुळे अपघाताचा धोका

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. परंतु, ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असून, अपघाताचा धोका आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते किशोर वडे यांनी व्यक्त केले आहे.

महामार्गच्या चौपदरीकरणाचे काम गेली सतरा वर्षांपासून सुरु आहे. किती ठेकेदार गेले किती आले? परंतु रस्त्याचे काम पूर्ण होईना. सुरवातीला काही वर्षे खडीमिश्रित डांबर टाकून करण्यात आले, परंतु ते काही टिकेना. यामुळे शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये वाया गेल्याचा आरोप श्री. वडे यांनी केला आहे. गेल्या वर्षी सिमेंट काँक्रेटचा रस्ता बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. काही ठिकाणचा रस्ता पूर्ण झाला आहे. त्या ठिकाणची बिले काढण्यासाठी जणू ठेकेदारांना घाई झालेली असून, म्हणूनच साईडपट्ट्यांचे काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. परंतु, त्या साईडपट्ट्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे श्री. वडे यांचे म्हणणे आहे.

ज्या ठिकाणचे सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणची रस्त्यावर असणारी सिमेंटची धुळ तशीच असल्यामुळे महामार्गावरील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धुळ वाहनचालकांच्या नाकातोंडात जात आहे. यामुळे खोकला, डोके दुखी, कंबरदुखी यासारखे आजार होताना दिसत आहेत.

Exit mobile version