नवघर उड्डाणपुलावर अपघातांचा धोका

| उरण | वार्ताहर |

नवघर उड्डाणपूल उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलामुळे पूर्व व पश्चिम हे विभाग जोडले जातात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नवघर उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे पुलावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पुलावर अंधारही आहे. पावसामुळे पुलाच्या कडेला व दुभाजकावर झाडेझुडपेही वाढली आहेत. या झुडपांमुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. अशा अनेक समस्यांना या उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

उरण-पनवेल महामार्गावरील फुंडे येथील साकव नादुरुस्त झाल्याने उरण तसेच द्रोणागिरी नोड या औद्याोगिक विभागामध्ये ये-जा करणारी प्रवासी व जड वाहने याच उड्डाणपुलाचा वापर करीत आहेत. पुलाच्या द्रोणागिरी नोड व उरण-पनवेल मार्ग या दोन्ही बाजूने खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतील धुळीचाही सामना करावा लावत आहे. खासकरून या पुलाशेजारीच असलेल्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी याच पुलावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवघर येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती त्याचप्रमाणे विजेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. या उड्डाणपुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची असून नवघर येथील नागरिकांनी मागणी करूनही सिडकोकडून दुर्लक्ष केले जात. सिडकोकडे सातत्याने मागणी करूनही सिडकोचे अधिकारी नवघर पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती नवघर येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश घरत यांनी दिली आहे.

Exit mobile version