पावसाळ्यात अतिउत्साही पर्यटन धोक्याचे

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
कोकणात आणि संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. विशेष करून कोकणात नदी, नाले, धरणे तुडुंब भरली असून पाणी ओसंडून वाहत आहे. समुद्र खूप खवळला असून उंच लाटा किनार्‍यावर धडकत आहेत. अनेक जण विशेष करून तरुण युवक आणि युवती पावसाळी पर्यटनासाठी कोकणात समुद्रकिनारी येत आहेत. काही मंडळी तर कुठे जातोय हे देखील घरी सांगत नाहीत. समुद्र किनारी जाण्यास बंदी असूनही ती झुगारून ही मंडळी पाण्याजवळ लाटा अंगावर झेलत मौज करताना देहभान विसरतात अशा परिस्थितीत अनेकवेळा अतिउत्साही पर्यटन करताना दुर्घटना घडू शकते. समुद्रचे भरती-ओहटी हे नियम समजावून घ्या.

पर्यटकांनो! पाण्याशी मस्ती करू नका, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो. समुद्र आता खवळला असून लाटांचे तांडव दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे धरणे देखील फुल्ल झाली असून अधिक जलसाठा कमी करण्यासाठी धरणांचे दरवाजे उघडावे लागतात. पावसाळ्यात पर्यटन करणार्‍या मंडळींची संख्या वाढती असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. समुद्रकिनारे आणि धरण क्षेत्रात ही मंडळी उतरताना पुरेशी माहिती नसल्याने दुर्घटना घडत असते. पाण्याशी मस्ती नही, सस्ती ही म्हण भरपूर काही सांगून जाते.

समुद्रकिनारा असो अथवा धरणाचे, नदीचे पात्र असो प्रवाहाची माहिती नसताना त्यामधून उतरण्याचे डेरिंग करू नका. समुद्रात माहिती नसताना अनेक पर्यटकां ना आपला जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन करा परंतु एकतरी बुजुर्ग सोबत ठेवल्यास उत्तमच! पावसाळी पर्यटन करा,पण जपूनच. जान सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

Exit mobile version