माझ्या जीवाला धोका; वैशाली भैसने-मानेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गायिका वैशाली भैसने माने हिने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे कलाकार मंडळींसह अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे तिने पोस्ट केली आहे. तसेच यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज असल्याची पोस्ट तिने केली आहे. याबाबत दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचेही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

वैशालीने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. वैशाली यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. तिला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद देखील देण्यात आले होते.

वैशालीने हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्‍वगायन केले आहे. बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटात पिंगा हे तिने गायलेले गाणे गाजले होते. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सारेगमपचे विजेतेपद पटकावणार्‍या वैशालीला हिंदी सारेगमपसाठीही विचारणा झाली होती. मात्र तेव्हा गर्भवती असलेल्या वैशालीने तिला सहभागी होता येणार नाही असं कळवलं होतं. तेव्हा प्रसूतीनंतर आठ दिवसात तिनं शोमध्ये सहभाग घेतला होता.

Exit mobile version