खारघर मध्ये धोकादायक जाहिरात फलक

नागरिकांच्या सुरक्षिततेकडे महापालिकेचे दुर्लक्ष

। पनवेल । वार्ताहर ।

खारघर परिसरात रस्त्याच्या दुभाजकात लावण्यात आलेल्या काही जाहिरात फलकांवरील पत्रे निखळले आहेत. तर काही रस्त्यांवरील पथदिवे बंद पडले आहेत. याशिवाय खांबांवर आणि रस्त्यावर अनधिकृतपणे लोंबकळणार्‍या केबल वायर नागरिकांना अडसर ठरत आहते. त्यामुळे पनवेल महापालिका प्रशासनाने निखळलेले जाहिरात फलक आणि केबल वायरकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खारघर मधील नागरिकांकडून केली जात आहे.

खारघर परिसरातील रस्त्यांवर जाहिरातीसाठी रस्त्याच्या दुभाजकात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. यापैकी काही ठिकाणचे जाहिरात फलक जीर्ण अवस्थेत असून, फलकांवरील पत्रा लोंबकळत असल्याचे चित्र दिसते. विशेष म्हणजे वादळी वार्‍याने जाहिरात फलक उन्मळून पडून अनेक ठिकाणी अपघाताचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे निखळलेले जाहिरात फलक वेळीच हटविण्यात यावे, अशी मागणी खारघर शहरातील नागरिक करीत आहेत. दुसरीकडे, खारघर शहरातील काही रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. तर काही रस्त्यांवर झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे पथदिव्यांना अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, नवरात्री उत्सव संपताच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे खारघर परिसरातील जीर्ण अवस्थेतील जाहिरात फलक, लोंबकळणार्‍या केबल वायर हटविण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहे, असे शिवसेना (उबाठा) खारघर उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे यांनी सांगितले.

Exit mobile version