मच्छिमार्केट जवळील विद्युत डीपी धोकादायक

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील उरण नाका येथील रस्त्यावर असलेली विद्युत डीपी धोकादायक परिस्थितीत असून, नादुरुस्त झाली आहे. या ठिकाणी नवीन डीपी बसविण्यास पनवेल महावितरण दुर्लक्ष करीत असून, कोणता अपघात होण्याची वाट महावितरण बघत आहे का, असा सवाल स्थानिक रहिवासी करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या टपालनाका येथील कार्यालयाकडून विद्युतपुरवठा सुरळीत आणि योग्य मार्गाने व्हावा, यासाठी डीपी जागोजागी बसविल्या आहेत. मात्र, विद्युत पुरवठ्याची जेवढी काळजी वितरण कंपनीने घेतली, तेवढी खांब आणि डीपी देखभालीकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले आहे. उरण नाका येथील पनवेल उरण रस्त्यावरील विद्युत डीपी धोकादायक झाली असून, एखाद्या वाहनाला जोरदार धडक बसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, याकडे पनवेल टपालनाका महावितरण कार्यालयाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पनवेल महावितरणचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती दिली असता त्यांनी तात्काळ कर्मचार्‍यांना पाठवून डीपीची दुरुस्ती करू असे सांगितले आहे.

Exit mobile version