वाफेघर पूल वाहतुकीसाठी धोकादायक

नवीन पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी

। सुधागड-पाली। वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील वाफेघर गावाला जोडणार्‍या पूलाचा काहीभाग वाहून गेला असून येथे मोठा रुंद खड्डा पडला आहे. शिवाय पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. परिणामी सद्यस्थितीत वाहनचालक व ग्रामस्थांना मोठी कसरत करत जावे लागत आहे.

या परिसरात साधारण साडेचारशेहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. यामुळे वाफेघर पुलावरून परिसरातील नागरिक, शेतकरी, चाकरमानी तसेच विद्यार्थी सातत्याने पाली व इतर ठिकाणी प्रवास करीत असतात. काही वर्षांपूर्वी येथील नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील प्रवास सुखकारक झाला होता. मात्र, आता हा पूल शेवटची घटका मोजत आहे.

या पुलावरील काँक्रिटीकरण खराब होऊन खड्डे पडले असून अपघाताला कारण ठरत आहेत. त्याचबरोबर दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात संभवत असल्यामुळे पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनले आहे. तसेच, एसटी बस व खासगी वाहन चालक याच पुलावरून ये-जा करत असतात. मात्र, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा पूल गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे. परंतु, या पुलाची अद्यापपर्यंत दुरुस्ती न झाल्याने प्रशासना विरोधात या ठिकाणचे नागरीक व वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत. तसेच, प्रशासनाने हा पूल नव्याने बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

वाफेघर पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहात आहे. मात्र, आजतागायत या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. मुसळधार पावसामुळे तर जोड रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या धोकादायक पुलाचे गांभीर्य लक्षात घेत हा पुल नव्याने बांधण्यात यावा.

राजेश बेलोसे, सामाजिक कार्यकर्ते, वाफेघर

वाफेघर पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असुन लवकरात लवकर पुलाची दुरूस्ती करण्यात येईल.

गुलाबराव देशमुख, शाखा बांधकाम अभियंता, पंचायत समिती पाली

Exit mobile version