तीन गावांची वाट बिकट

दुचाकी चालकांचा धोकादायक प्रवास

| उरण | वार्ताहर |

फुंडे, डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणारा जुना शेवा फाटा ते फुंडे दरम्यानच्या रस्त्यावर मातीचा डंपर टाकून रविवारी बंद केला आहे. त्यामुळे या गावांची वाट बिकट झाली आहे. मात्र तरीही दुचाकी चालक धोकादायक प्रवास करीत आहेत. तर हा रस्ता बंद झाल्याने नागरीकांना लांबचा प्रवास करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील फुंडे, डोंगरी व पाणजे या गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील सिडकोचा खाडीपूल 2021 मध्ये कोसळला आहे. यामध्ये एका तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उरण मधील सर्व खाडीपुलाच्या तपासणी करण्यात आली. यामध्ये उरण पनवेल मार्गावरील खाडीपूल ही कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एस टी व एन एम एम टी बसेस बंद करण्यात आली आहेत.

परिणामी फुंडे, डोंगरी, पाणजे व बोकडवीरा या चार गावातील नागरीकांना सहा किलोमीटर दूर अंतरावर बस साठी जावे लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उरण ते फुंडे जुना मार्ग ही बंद होता. त्याची माजी आ. मनोहर भोईर व महादेव घरत यांनी दुरुस्ती करून सुरू करण्यात आला. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र कमकुवत असलेल्या या मार्गावरून जड डंपर ये जा करू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील मोरी पुन्हा नादुरुस्त होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे बंदी घालण्यात आली होती. तरीही जड वाहने ये जा करीत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Exit mobile version