कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी बसेस मधून; स्कूल बसचा पत्ता नाही

| नेरळ | बातमीदार |

रस्ते अपघातात दररोज प्रवशांचा जीव जात असून कर्जत तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची कोणतीही भीती दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना स्कूल बस ऐवजी खासगी बसेस मधून शाळेत नेले जात असून फार थोड्या प्रमाणात स्कूल बसेस चालवल्या जात आहेत. दरम्यान, त्या खासगी वाहनांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी शाळांचे पेव फुटले असून त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना घरातून शाळेत पोहचवण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत असलेले पालक गाड्यांमधून जावू देत असतात. मात्र त्या विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने कशी आहेत, आरटीओ यांची त्या वाहनांना मान्यता आहे काय? याबाबत पालक विचार करीत नाहीत.

कर्जत शहर तसेच नेरळ सह तालुक्याच्या सर्व भागांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून काही ठराविक शाळांमध्ये स्कूल बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. मात्र निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी बसेस तसेच इको व्हॅन देखील वापरल्या जातात. आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी शाळांमध्ये येण्यासाठी रिक्षा, व्हॅन आणि बसमधून प्रवास करून शाळेत येत असतात. मात्र, ही वाहतूक करताना नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत शहरात स्कूल व्हॅन आणि बसमध्ये चालकाच्या बाजूचे सीटवर देखील अनेक विद्यार्थ्यांना बसविले जाते. एवढेच नव्हे तर लक्झरी बसमधून देखील विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. त्यासाठी लक्झरी बस तसेच रिक्षामधुन विद्यार्थ्यांची ने-आण करताना स्कूल व्हॅनसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

तालुक्यात अनेक नामांकीत संस्थांच्या शाळा असून या संस्थांच्या स्वतःच्या देखील बसेस आहेत. पण, या बस देखील नियमांची पायमल्ली करीत विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दिसत आहेत. या बसेसमध्ये कुठेही स्कूलबस असा कोणताही उल्लेख आढळून येत नाही. तसेच बसमध्ये वाहन चालकांसोबत मदतनीस असणे आवश्यक असताना या टूर बसमध्ये मदतनीस उपलब्ध नसल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खिडक्यांवर जाळ्या नाहीत आणि फ्रंट सीटलाही 3-4 विद्यार्थ्यांना बसविले जात असल्याचे दिसून येत आहे. तरी आरटीओ आणि पोलिसांकडून या खासगी बसेस बद्दल आक्रमक भूमिका घेण्याची गरज पालक वर्गातून बोलली जात आहे. काही शाळा देखील अमुक एक बसेस मधूनच वाहतूक झाली पाहिजे असा देखील दबाव टाकत असतात. त्यामुळे पालकांचा देखील नाईलाज होत असतो. त्याबाबत आरटीओ आणि पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होते की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी वाहन अपघात व रस्ता सुरक्षिततेबाबत चांगलेच गंभीर असताना चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून स्कूल व्हॅन व बस चालक विद्यार्थ्यांची सर्रासपणे वाहतूक करीत आहेत. मात्र, कर्जत पोलीस आणि आरटीओ विभाग याबाबत अद्याप चांगलेच अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर पोलीस व आरटीओला जाग येणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Exit mobile version