प्रा. आ. केंद्रासमोर धोकादयक खड्डा

नागोठणे | वार्ताहर |

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघाल्याने एक भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिका-यांनी याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे नागोठणे प्रा. आ. केंद्रासमोरील तो खड्डा बुजविण्यासाठी महामार्ग खाते अपघाताची वाट पाहतेय का?  असा प्रश्न उपस्थित करून या खड्ड्यासह येथील दुसऱ्या खड्ड्यांची तसेच उखडलेल्या साईड पट्टीची तातडीने डागडुजी करावी अशी अशी मागणी वाहनचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित दळवी यांनी केली आहे.
वडखळ, नागोठणे, सुकेळी खिंड ते कोलाड या अंतरातील रस्त्याची अवस्था तर आजही भयानक आहे. आलटून पालटून सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाने या रस्त्याच्या पूर्णत्वाच्या बाबतीत केलेली सर्व आश्वासने आजपर्यंत हवेतच विरून गेली आहेत.असाच काहिसा प्रकार राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच असलेल्या नागोठण्यातील प्रा.आ.केंद्राच्या समोरील रस्त्याच्या बाबतीत दिसून येत आहे. येथील पेव्हर ब्लॉक निघाल्याने एक जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच याच ठिकाणी इतर अनेक छोटे खड्डे तयार झाले असून नागोठण्यात येण्यासाठी असलेल्या रस्त्याची साईड पट्टी पूर्णतः निघाली आहे. यामुळे या ठिकाणी शंभर मिटरच्या अंतरातील रस्ता अंत्यंत धोकादायक बनला आहे. या ठिकाणी असलेला हा खड्डा चुकवायला गेल्यास एकतर रस्त्याखाली जायची भिती अथवा मागून येणाऱ्या वाहनाने धडक देण्याची भिती निर्माण झाल्याने येथे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज ज्या ज्या ठिकाणी हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत तेथील परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे हे खड्डे व साईड पट्टी तातडीने बुजविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version