रस्ते डांबरीकरणात धोकादायक साईड पट्ट्या

रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले दुचाकीस्वाराचे प्राण

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील मुख्य रस्त्याच्या होत असलेल्या डांबरीकरणात दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या धोकादायक ठरत आहेत. या साईड पट्ट्या न भरल्यामुळे दुचाकी अपघातात वाढ होत असल्याचे समोर येत आहे. नुकताच एका रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे दुचाकीस्वाराचा प्राण वाचला आहे. या नवीन रस्त्याच्या साईड पट्ट्या लवकरात लवकर भरण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

साळाव-मुरूड-आगरदांडा रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम जोरदार चालु आहे. परंतु, हे रस्ते करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या काही ठिकाणी 6 इंचा पेक्षा जास्त खोल झाल्याने त्या धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे दिवसांत एक तरी अपघात होतो आहे. हे रस्ते करत असताना ताबडतोब साईड पट्ट्या भरणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघात वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

यातच मुरूड-आगरदांडा रस्त्यावर दुचाकी स्वाराचा प्राण रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचला आहे. आगरदांडा येथील रुग्णवाहिकेचे चालक निकेतन सुर्ते रुग्णवाहिका घेऊन मुरूडच्या दिशेने जात असताना दुचाकी स्वार समोरून येणार्‍या रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी साईड पट्टीवर उतरत असताना या खोल साईड पट्टीमुळे दुचाकी घसरली व दुचाकी स्वार रुग्णवाहिकेच्या चाकाखाली येत असताना रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानतेने रुग्णवाहिका थांबवून प्राण वाचविले आहे. हे बनविलेले रस्ते अरुंद असल्याने अचानक मोठी गाडी आली की दुचाकी स्वरांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते आहे. पण या साईड पट्ट्या 6 ते 8 इंच खोल असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. तरी, या साईड पट्ट्या लवकरात लवकर भरण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. नाहीतर एखाद्या वाहन चालकाचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version