। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वाजे गाव येथील अर्पिता फार्म शेजारी एक जीवघेणा कुंडी धबधबा आहे. सदर धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून सदर धबधब्यात उतरतात परंतु पाण्याचा प्रचंड वेग व मोठ्या बोवर्यात ते अडकून राहिल्याने पाण्यात बुडून मयत होतात. दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले व नवतरुण बुडून मृत्युमुखी पडत असत.
त्यावर कायमचा प्रतिबंध व्हावा याकरिता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनवणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वाजे ग्रामपंचायत कमिटी, मंडळ अधिकारी अजित पवार व वन खात्याचे आरएफओ सोनवणे यांच्या मान्यतेने व उपस्थितीत सदर कुंडी धबधब्यात ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठा 10 ते 15 फुटाचा खड्ड्यात पाण्याचा भवरा तयार होतो तो खड्डा पोकलेन मशिन व नियंत्रित ब्लास्टिंगच्या साहाय्याने संपूर्ण दगडांचा भराव करून कायमचा बुजविण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तेथे कोणतीही दुर्घटना होणार नाही. सदर कामगिरी यशस्वी होणेसाठी पोलीस ठाणेकडील पोहवा ओंबासे, पोना जयदीप पवार व पोशि भोये यांनी विशेष मेहनत घेतली.