। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातून जाणार्या कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर सावळा फाटा येथे एका अनोळखी इसमाने आपण पोलीस असून, भूलथापा मारून दोघे वाटसरू यांची फसवणूक केली. सोन्याची साखळी आणि अंगठी लंपास केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि. 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सावळा फाटा येथे कडाव बौद्धवाडा दोघे थांबले होते. त्यावेळी अनोळखी इसमांनी तरुणाजवळ जाऊन आपण पोलीस असून, आम्ही चोराकडुन दोन लाख रुपये,अंमली पदार्थ व रिव्हॉल्वर पकडली आहे आणि त्यामुळे हद्दीत गस्ती घालत आहोत. त्याचवेळी आणखी काही संशयित या भागात असल्याने तुम्ही तुमच्या गळ्यातील चेन व सोन्याची अंगठी काढून रुमालामध्ये ठेवा, असे सांगितले.काही वेळानंतर त्यांनी रुमालामध्ये पाहिले असता, सोन्याची चैन व अंगठी मिळून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. या गुन्ह्यात एकूण 67,500/- रुपये किमतीच्या ऐवजाची फसवणूक झाली आहे. याबाबत अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्यातील हवालदार लोखंडे हे करीत आहेत.