सबलेंका, रायबकीनाची आगेकूच
। पॅरिस । वृत्तयंस्था ।
फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी पुरुष एकेरीतील पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव याला पराभवाचा धक्का बसला. अॅलेक्स दी मिनॉर याने त्याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवला. महिला एकेरी विभागात अरीना सबलेंका, एलीना रायबकीना यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. सबलेंका हिने इम्मा नवारो हिला, तर रायबकीना हिने एलिना स्वितोलिना हिला पराभूत केले.
डॅनिल मेदवेदेव याने पहिला सेट 6-4 असा आपल्या नावावर केला. मात्र, अॅलेक्स दी मिनॉर याने पुढील तीनही सेटमध्ये मेदवेदेव याच्यावर वर्चस्व गाजवले. त्याने या तीन सेटमध्ये 6-2, 6-1, 6-3 अशी बाजी मारली व मेदवेदेवचा खेळ खल्लास केला. दुसरी मानांकित अरीना सबलेंका हिने 22वी मानांकित इम्मा नवारो हिला 6-2, 6-3 असे सहज नमवले. सबलेंका हिने एक तास व नऊ मिनिटांत प्रतिस्पर्धीचे आव्हान संपुष्टात आणले. चौथी मानांकित एलीना रायबकीना हिने 15वी मानांकित एलीना स्वितोलिना हिच्यावर 6-4, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. तिनेही एक तास व नऊ मिनिटांत विजय साकारला.
स्विअतेक, गॉफची घोडदौडमहिला एकेरीत रविवारी मध्यरात्री इगा स्विअतेक व कोको गॉफ या दोन मानांकित खेळाडूंनी पुढे पाऊल टाकले. प्रथम मानांकित स्विअतेक हिने अॅनास्तासिया पोतापोवा हिचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडवला. स्विअतेक ही अवघ्या 40 मिनिटांमध्ये विजयी झाली. तिसरी मानांकित गॉफ हिनेही शानदार विजयाला गवसणी घातली. तिने एलिसाबेता कोशिअरेटो हिचे आव्हान 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले.
यानिक सिनरची यशस्वी झुंजपुरुष विभागातील एकेरीच्या लढतीत दुसरा मानांकित यानिक सिनर याने संघर्षपूर्ण विजय साकारला. सिनर याने कोरेंटीन मॉटेट याच्यावर चार सेटमध्ये मात केली. सिनर याने पहिला सेट 2-6 असा गमावला. त्यानंतर मात्र, त्याने झोकात पुनरागमन केले. सिनर याने पुढील तीन सेट 6-3, 6-2, 6-1 असे जिंकत सामना जिंकला आणि पुढे वाटचाल केली. सिनरसह पुरुषांच्या एकेरीत कार्लोस अल्काराझ, ग्रिगोर दिमित्रोव, स्टेफानोस सितसिपास यांनीही घोडदौड केली.







