| नवी मुंबई | वार्ताहर |
कोकणातील हापूस आंब्यासारखा चवीला आणि रंगाला हुबेहूब दिसणाऱ्या आफ्रिका खंडातील मालावी देशाचा हापूस आंबा दिवाळीच्या मुहूर्तावर वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये डेरेदाखल झाला आहे. या आंब्याला प्रतिकिलो 4 हजार ते 5 हजार 500 पर्यंत भाव मिळाला असून अवघ्या दहा मिनिटांत साडेपाचशे पेट्यांची विक्री झाली आहे.
आफ्रिका खंडात उन्हाळा सुरू असल्यामुळे मालावी देशातील हापूसचे आगमन झाले आहे. कोकणातील हापूसशी साधर्म्य असल्यामुळे या आंब्याला आफ्रिकेतही हापूस नावानेच संबोधले जाते. तीन ते सव्वा तीन किलो ग्रॅम वजनाचा हा आंबा खाण्यासाठी अगदी कोकणातील हापूस आंब्यासारखा लागतो. त्यामुळे बाजारात आल्यावर 600 बॉक्सची विक्री झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली. अशातच सध्या आफ्रिकेत 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत हापूसचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत हा आंबा एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये मात्र कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होणार असल्याने तोपर्यंत मालावीचा हापूस हा पर्याय ठरणार आहे.
कोकणच्या हापूसची अफ्रिकेत लागवड मालावीतील मँगो कंपनीने दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी व दापोली येथील हापूस आंब्याच्या फांद्या आयात केल्या होत्या. या फांद्यांवर संशोधन करून त्यापासून आंब्याची कलमे तयार करून तब्बल 450 एकर जागेत फळबाग केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आंबा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.