स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचे दर्शन दोन टप्प्यात


रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले कारवांचीवाडी पोमेंडीबुद्रुक येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान हे गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून भाविकांसाठी दर्शनास्तव खुले करण्यात येणार आहे. मात्र शासनाची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हे मंदिर सकाळी 8 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत असे दोन टप्प्यात भाविकांसाठी सुरू असणार आहे.


मंदिर परिसरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आरोग्यविषयक निर्बंधांचे पालन अनिवार्य आहे. मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी रांगेतून प्रवेश, हातावर सॅनिटायझर, हात पाय धुणे, शासननिर्देशित अंतर राखून एका वेळी एकाने दर्शन, दुसर्‍या मार्गाने निर्गमन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाव्यतिरिक्त कोणतेही उपक्रम देवळात होणार नाहीत. दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली असून तसे फलक लावले आहेत. फलकावर दिलेल्या सूचना पाळणे बंधनकारक आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन न्यासाचे मुख्य विश्‍वस्त प्रा. उदय बोडस व नवरात्र काळासाठी काम करणार्‍या संयोजन समितीचे अध्यक्ष शशिकांत बारगोडे यांनी केले आहे.

Exit mobile version