। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थस्थळे बंद असून त्यापैकीच एक रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळ्याचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचाकडून करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे . राज्यातील इतर भागात पर्यटन स्थळांना मोकळीक मिळाली पण श्रीक्षेत्र गणपतीपुळे बाबत दुजाभाव का ? असा सवाल करुन येत्या पाच दिवसांत याबाबत योग्य निर्णय झाला नाही, तर आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य भाविक या आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती समविचारीच्या वतीने देण्यात आली आहे.